



राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भाजपा मुंबई अध्यक्षपदी माझी नियुक्ती करण्यात आली. यावेळी पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. मा. श्री. रवींद्र चव्हाण जी यांनी मला नियुक्तीचे अधिकृत पत्र दिले.
या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष आ. मा. श्री. रविंद्रदादा चव्हाण, महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे जी, कॅबिनेट मंत्री मा. श्री. आशिष शेलार जी, कॅबिनेट मंत्री मा. श्री. मंगलप्रभात लोढा जी यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते, तसेच आ. श्री. प्रविण दरेकर जी, आ. श्री. योगेश सागर जी, आ. श्री. संजय उपाध्याय जी यांच्यासह मुंबईचे सर्व जिल्हाध्यक्ष, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी, गृहमंत्री मा. श्री. अमित शाह जी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. जे.पी. नड्डा जी, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्र चव्हाण जी यांनी माझ्यावर विश्वास ठेवून इतकी महत्त्वाची जबाबदारी दिल्याबद्दल मी या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २०१४ पासून झालेल्या प्रमुख पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांनी मुंबईला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. यात कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो प्रकल्प, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, सीसीटीव्ही देखरेख व्यवस्था आणि २०११ पर्यंत झोपडपट्टीवासीयांना घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तसेच अल्प, कमी व मध्यम उत्पन्न गटांसाठी घरे देण्यासाठी राबविण्यात आलेल्या गृहनिर्माण सुधारणा यांचा समावेश आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासह, देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबई परिवर्तनाच्या मार्गावर आहे आणि ते पुढे नेण्याचे काम मी व माझे सहकारी करू.
मुंबईसाठी पक्षाचे हे व्हिजन पूर्ण करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. महायुतीचा भगवा झेंडा बीएमसीवर फडकवण्यासाठी आणि बीएमसीमध्ये महायुतीचा महापौर बसवण्यासाठी आम्ही सर्व एकदिलाने काम करू. पायाभूत सुविधा, गृहनिर्माण व वाहतूक व्यवस्थेबरोबरच मुंबईकरांची सुरक्षा व सुरक्षितता याला आम्ही सर्वोच्च प्राधान्य देऊ आणि मुंबईचा रंग बदलण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडू.
तसेच १९९७ ते २०२२ या काळात बीएमसीमध्ये झालेल्या देशातील सर्वाधिक ३ लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारापासून मुंबई महानगरपालिकेला मुक्त करण्यासाठी आणि नागरी प्रशासनात पारदर्शकता व जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी मी व माझे सहकारी सर्वतोपरी प्रयत्न करू.
मुंबईत पक्षाचे संघटन अधिक बळकट व दृढ करण्यासाठी आपण सर्व मला सहकार्य कराल, या विश्वासाने मी मुंबई भाजपा अध्यक्षपदाची जबाबदारी नम्रपणे स्वीकारतो. दिग्गजांनी भूषविलेल्या या पदावर माझी निवड करून माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आणि मला ही संधी दिल्याबद्दल पक्ष नेतृत्वाचे मी पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार मानतो तसेच, मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्याचा निर्धार करतो.







Leave a Comment