मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे जी, उपमहापौर श्री. संजय घाडी जी, माजी खासदार मा. श्री. किरीट सोमैया जी, प्रभाग समिती अध्यक्ष, नगरसेवक श्री. रोहन राठोड जी, नगरसेवक श्री. विठ्ठल बंदेरी जी, नगरसेवक श्री. रुपेश सावरकर जी, नगरसेविका सायली कुलकर्णी यांच्या उपस्थितीत आज शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या विविध समस्या आणि आधुनिकीकरणाबाबत प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेला क्रीडा सुविधा सहज उपलब्ध करून देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने स्टेडियमवरील केवळ फुटबॉलची मक्तेदारी संपवून पालिकेच्या नियमानुसार आवश्यक शुल्क घेऊन ते विविध शाळा, कॉलेजेस आणि कबड्डीसारख्या इतर खेळांसाठी खुले करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, पिकल बॉल आणि जिम्नॅस्टिक्स यांसारख्या खेळांसाठी थर्ड पार्टी एजन्सीला दिलेल्या जागांचा ट्रस्टच्या बैठकीत सखोल रिव्ह्यू घेतला जाईल.
यासोबतच, बंद असलेल्या बँक्वेट हॉलचा योग्य वापर करण्याबाबत ट्रस्ट निर्णय घेईल. विशेष म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित असलेल्या जागेवर नाटक आणि सिनेमा दोन्हीसाठी उपयुक्त ठरेल असे ‘मल्टिपर्पज थिएटर’ उभारण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश दिले असून, हे मल्टिप्लेक्स केवळ मराठी चित्रपटांसाठी आरक्षित असेल.
याआधी या संकुलावर प्रायव्हेट मक्तेदारी होती, ती संपवून आता हे क्रीडा संकुल सर्वसामान्य जनता आणि मुंबईकरांसाठी खुले करण्यात येईल. मुंबईकरांना आणि क्रीडाप्रेमींना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा अत्यंत पारदर्शक पद्धतीने मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

















Leave a Comment